ब्लॉग फॉलो करा व नवीन लेख वा व्हिडिओची माहिती ई मेल वर मिळवा.

Sunday 18 March 2018

प्रास्ताविक

प्रवासात अनेक प्रकारचे फोटोग्राफर दिसतात आपल्याला. काही असतात, जे सतत क्लिकक्लिकाट करत असतात, डोळ्यांना सतत कॅमेरा चिकटलेला असतो यांच्या.

काही असे असतात, जे आजुबाजुंच्या लोकांना सतत कसे उभे रहा म्हणून सांगत असतात. कॅमेरातली चौकट परफेक्ट होण्याच्या खटपटीत असतात सतत.

काही जण फक्त माणसांचेच फोटो काढणारे.

काही सेम पॅम्प्लेटमधल्या सारखा फोटो काढण्यासाठी धडपडणारे.

काही शांतपणे, जाणवूनही न देता, निसर्ग, लोक, इमारती यांनी जराही अॅडजेस्ट न करायला लावता हलकेच क्लिक करणारे असतात.

फोटोग्राफर्सच्या किती तरी तऱ्हा!

तसंच फोटोंच्या मात्र एकच एक तऱ्हा!
आग्ऱ्याला जाऊन आलेल्यांच्या अल्बम मधे एक फोटो हमखास असणारच. मागे स्टँड स्टिल ताजमहाल, पुढे एका संगमरवरी बाकावर बसलेले कपल, आजुबाजूला प्रचंड गर्दी.

किंवा काश्मिर म्हटलं की फुलांच्या शिकाऱ्यात बसून दाल लेक मधला फोटो किंवा मग चार चिनार मागे उभे असलेला होडीतला फोटो.

आठवून बघा बरं, ताजमहाल तुम्ही बघायला गेलात तेव्हा त्याचे वेगळेपण कोणत्या क्षणी जाणवलेले तुम्हाला? त्या क्षणाचा फोटो तुमच्या मनात ठसठशीत उमटलाय. पण फोटो आहे? का नाही बरं?

कारण ताजमहाल बघायला जात असताना तो आधी अजिबात दिसत नाही. अगदी बस मधून उतरून आत जातानाही दिसत राहते ती लाल चुटूक दगडी भिंत.
अन मग तो क्षण येतो. आपण त्या दारापाशी येतो, आणि अक्षरश: स्तब्ध होतो. कारण इतका वेळ कणभरही न दिसलेला ताजमहाल पूर्ण,आपल्या सगळ्या जादुंसह आपल्याला स्तंभित करत समोर उभा असतो.
डोळ्याच्या पातळीच्या थोडा वर, जणुकाही आधांतरी ठेवलाय असा, स्वप्नवत!

बाजुचे मिनार त्याचा तोल सांभाळत, आपल्या नजरेला बांधून घालत असतात. ही जी ताजमहलच्या निर्मात्याची नजर आहे; त्याला जे , जेव्हा आणि जसं दाखवायचय तशा ठिकाणी तुम्ही येत नाही, तो वर ताजमहाल दिसतच नाही. आपण बघतो तो फक्त त्याचा ताजमहाल, त्याला जस्सा दाखवायचा होता, बरोब्बर तसा ताजमहाल आपण बघतो.

ही अशी दृष्टी आपल्या फोटोतही हवी. मला जे , जसं दिसलं; ते आणि तसंच मला इतरांना दाखवता आलं पाहिजे. मग आपोआप आपले फोटो इतरांसारखे असणार नाहीत. ते फोटे "आपले"फक्त "आपले" असतील.

मी ही हे हळूहळू शोधत गेले. खरं तर टेक्निकली मला कुठलच प्रशिक्षण नाही फोटोग्राफीचं. पण मला नजर आहे. माझ्या आसपास घडणाऱ्या गोष्टीतलं मला माझं असं काही दिसत असतं. ते पकडण्याचा प्रयत्न करत राहते मी. ही सारी प्रोसेस चक्क ट्रायल अँड एरर अशीच. मग मला जे सुचलं, जे जाणवलं ते फकित शेअर करतेय तुमच्याशी.

फोेटोग्राफी टेक्निकनुसार ते बरोबर असेलच असं नाही. पण तुमचा फोटो तुमचा ठरवता येईल हे सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन.

माझा फोटो काढण्याचा छंद खूप जुना. जेव्हा फिल्म, ती डेव्हलप करणं, प्रिंट काढणं हे सगळे सोपस्कार होते त्या काळात. स्वाभाविकच खूप खर्चिक मामला होता तो. शिवाय तेव्हा मी विद्यार्थी दशेत होते. याचा फायदा असा झाला की प्रत्यक्ष क्लिक करण्याआधी किमान दहा वेळा कॅमेराच्या डोळ्यातून बघून नक्की वेगळं काही असेल तरच क्लिक करण्याची सवय जडली. दहा वेळा क्विक करावसं वाटणं थोपवून अकराव्यांदा क्लिक करण्यातून योग्य, चांगला क्षण , फ्रेम कुठली हे आपापता शिकले.

खूप अलिकडे माझ्या हातात डिजिटल कॅमेरा आला. पण तरीही जुनी सवय गेली नाही, आणि त्यामुळे जे क्लिक केले त्या फोटोंची संख्याही कमी राहिली अन त्याची क्वालिटीही राहिली.

एकदा भटकंतीचे ठिकाण ठरले की मी काय करते , तर नेट वरचे त्या ठिकाणचे फोटो पाहते. आणि कोणते फोटो नाही काढायचे हे ठरवते :-P  

तिथे गेल्यावर स्थानिक लोकांना वेगळे काही स्पॉट्स आहे का हे विचारते. बऱ्याचदा वेटर लोकांची खूप मदत होते. ऑफबिट ठिकाणं  कळतात. स्वाभाविकच आपले फोटो आम फोटो होत नाहीत.

त्या ठिकाणी गेल्यावर आधी डोळ्यांनी सारे मनसोक्त बघून घेते. मनाचा कॅमेरा सर्वात जास्त टिकणारा :-)  त्यात भरून घेते निसर्ग, इमारती, लोकं... अन मग त्यातले एखादे वेगळेपण मनात भरते. ते क्लिक करते. अँगल, प्रकाश, गर्दी यांचा विचार करून पुन्हा क्लिक करते.

मनात त्यावेळी येणारे सगळे नियम या इथे सांगण्याचा प्रयत्न करणारे. हे सगळेच नियम काही प्रत्येक फोटोत असतील असाही नाही. कधी एक, कधी चार, कधी सगळे किंवा कधी प्रत्येक नियम धुडकावून देऊनही फोटो काढलेत. पण ते नियम माहिती तर हवेतच.

शेवटी हे नियम कशाला? तर बघणार्याला फोटो बघाताना छान वाटलं पाहिजे. मला जसं दिसलं तसं त्यालाही दिसावं म्हणून हि धडपड !

बाकी मजा करा, भरपूर फोटो काढा अन दाखवाही ! :)

Saturday 17 March 2018

१. सर्वसामान्य माहिती

फोटोग्राफी बेसिक्स
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEimBgM092_NljnmLPKJSZidUyR-ee8IrtJV0h_Hhi0xxp-_wn0iaCjYArAh3jw5uCUqJQFjToBPcJyVdVLH-yWKCN0DjocZWHx_Z5cNUhDiqlY32HmPg8aoatNr8zuo0cUFhY8QgRK-3Te0/s320/rule.jpg


1.कम्पोझिशन

ज्याचा फोटो काढायचाय ते टारगेटच फक्त आपल्याला दिसत. आजुबाजूला कुठेच बघत नाही आपण आणि ते लक्ष्य दिसल्यावर धनुर्धारी अर्जुनासारखे बाण मारून..आपलं बटण दाबून मोकळे होतो. नंतर फोटो बघितला कि त्या फोटोमध्ये असंख्य नको असलेल्या गोष्टी दिसतात.

फ्रेमच्या चारीही कडा बघा,  काय नको ते बघा, काय हवं ते बघा, गिचमिड टाळा, वेगळ काही दाखवा, नजरेच्या पातळीत बसून फोटो काढा, डोळ्यातले हे भाव, ती चमक (कॅचलाईट), क्लोजअप टू मच, रूल ऑफ थर्ड, खोली दाखवा, गोल्डन पोईंट, सिमिट्री, रेषा तिरप्या जातील अस बघा, गिव्ह मी सम स्पेस, नसलेली चौकट निर्माण करा. ( याचा नंतर तपशीलवार व्हिडिओ आपण बघु)

2.शटरस्पीड

शटर हा एक पडदा आहे. आणि तो फिल्म किंवा डिजीटल सेन्सरवर येणारा प्रकाश थोपवून धरतो. आणि आपण बटन क्लिक केल्यावर तेवढ्या पळापुरतं ते उघडतं.

शटरस्पीड म्हणजे किती वेळात हा पडदा वेगाने उघडून परत बंद होतो तो काळ.
जास्त वेगात पडदा उघडला तर अगदी कमी वेळ प्रकाश पडणार आणि कमी वेळात पडदा उघडला तर जास्त वेळ प्रकाश पडणार.
खूप उजेड : जास्त शटर स्पीड फारच अंधार : कमी शटर स्पीड: हात हळू शकतो म्हणून ट्राय पौड. कधी कधी मात्र हा इफेक्ट असा वेग दाखवण्यासाथी वापरता येतो.
बल्ब (BULB) असाही एक ऑप्शन : जितका वेळ बटन दाबून ठेवू तितका वेळ ते उघडे रहाते. ( फायर वर्क्स )

मॅन्युअल मोड {M}[M], अ‍ॅपेर्चर प्रायोरिटी मोड {Av}[A], शटर प्रायोरिटी मोड {Tv}[S]
मॅन्युअल मोड - शटर आणि अ‍ॅपेर्चर दोन्ही फोटोग्राफरला ठरवावे लागते
अ‍ॅपेर्चर प्रायोरिटी मोड - फोटोग्राफर अ‍ॅपेर्चर ठरवतो, आणि कॅमेरा शटरस्पीड आपोआप ठरवतो.
शटर प्रायोरिटी मोड - फोटोग्राफर शटरस्पीड ठरवतो, आणि कॅमेरा अ‍ॅपेर्चर आपोआप ठरवतो.
शटर स्पीड वाढवण्यासाठी आयएसओ वाढवणे, अ‍ॅपेर्चर वाढवणे अशा काही गोष्टी करता येतात. जास्त शटर स्पीड असल्याने मोमेंट फ्रिज

3. आय एस ओ

जास्त आयएसओ म्हणजे सेन्सर जास्त सेन्सिटिव्ह. मग तो हवा असलेला प्रकाश पकडताना नको असलेला प्रकाशही पकडतो आणि फोटोमध्ये नॉइज दिसतो. नॉइज म्हणजे फोटोत अतिशय बारीक रंगीत किंवा साधेच अनेक ठिपके दिसतात. यामुळे फोटोची क्लॅरिटी, शार्पनेस कमी होतो. फिल्ममधेही जास्त आयएसओ मुळे ग्रेनी फोटो मिळतात.

घरातला समारंभ आहे. तर प्रकाश अर्थातच कमी असणार. मग शटर स्पीड कमी होणार आणि कमी प्रकाशातले फोटो हललेले किंवा काळपट येणार. तुम्ही जास्त आयएसओ असलेली जसे २०० किंवा ४०० वाली फिल्म घेतली तर फास्ट शटर स्पीड मुळे हललेले(ब्लर) फोटो यायचे प्रमाण कमी होऊन कमी प्रकाशातही चांगले फोटो येतील. पण समजा हीच फिल्म घेऊन तुम्ही दुपारच्या रणरणत्या उन्हात फोटो काढायला गेलात कि काय होईल? खूप प्रकाश असल्याने कॅमेर्‍याला शटर स्पीड खूप वाढवावा लागेल. पॉईंट आणि शूट कॅमेर्‍यात इतका जास्त शटर स्पीड जात नसेल तेव्हा फोटो ओव्हर एक्सपोज होऊन पांढरट येतील.

4. अ‍ॅपेर्चर

अ‍ॅपर्चर म्हणजे एक भोक ज्यामधून कॅमेरा सेन्सर /फिल्म  वर किती प्रकाश पाठवायचा ते ठरवलं जातं. भोक जेवढं मोठं तितका जास्त प्रकाश  सेन्सर वर पडणार आणि भोक जितकं छोटं तितका कमी प्रकाश लेन्स वर पडणार. जितका नंबर छोटा तितक अ‍ॅपर्चर मोठं म्हणजेच जास्त प्रकाश आत जातो. अ‍ॅपर्चर हे लेन्स चे स्पेसिफिकेशन म्हणून सांगितले जाते. आणि या अ‍ॅपर्चरच्या व्हेल्यूवर लेन्सच्या किमती बदलतात. जितके जास्त अ‍ॅपर्चर असेल (कमी नं.) तितकी लेन्स महाग.

डेफ्थ ऑफ फिल्ड : अंतराची एक रेंज जी तुलनेने सगळ्यात अधिक फोकस मध्ये आणि शार्प असते. फोटोमध्ये नेहेमी एक सर्वाधिक शार्प ऑब्जेक्ट असतं. त्याच्या पुढच्या आणि मागच्या वस्तू क्रमाक्रमाने धुसर होत गेलेल्या असतात. हे धुसर होणे

जागा आणि माणसं दोन्ही चांगले फोकस मध्ये दिसावेत यासाठी अपेर्चर कमी केलं म्हणजे फ/११ फ/१६ फ/२२  असे केले तर सर्व भाग फोकस मध्ये दिसेल.



Wednesday 14 March 2018

४. रूल ऑफ थर्ड


डेफ्थ ऑफ फिल्ड



महाभारतातली गोष्ट आठवतेय? अर्जुनाने पक्षाच्या डोळ्यावर बाण मारल्याची? बस ती पूर्ण गोष्ट म्हणजे डेफ्थ ऑफ फिल्डची गोष्ट  ;)
आश्रमातले एक उंच झाड, त्याला असणाऱ्या अनेक फांद्या, त्यातल्या उंच फांदीवर टांगलेला पक्षी. त्या पक्षाचा डोळा. आणि खाली उभे अनेत शिष्य.
कोणाला वरचं निळं आकाश दिसलं. कोणाला फक्त झाडच दिसलं. कोणाला झाडावर टांगलेला पक्षी दिसला. तर अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळाच दिसला.
असं का झालं? तर प्रत्येकाचा दृष्टिकोण वेगळा होता, फोकस वेगळा होता. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे दिसले.  आणि जे दिसले ते फोकस मधे राहिले, बाकीचे आऊट ऑफ फोकस म्हणजेच ब्लर राहिले.
बसं
हेच फोटो काढताना करायचे असते तेव्हा वापराचे टेक्निक म्हणजे डेफ्थ ऑफ फिल्ड!
मोबाईल वा छोट्या कॅमेराने फोटो काढताना आपण कशावर फोकस जास्त करतो त्यावर कोणती गोष्ट स्पष्ट दिसेल अन कोणती गोष्ट ब्लर दिसेल हे ठरते.
उदा. हा फोटो पहा.

यात पेन होल्डर फोकसमधे आहे अन मागचे सर्व ब्लर आहे.

आणि हा फोटो पहा.


यात सर्वच गोष्टी फोकस मधे आहेत.

अर्थातच मोठ्या कॅमेरामधून, अपार्चरचा योग्य उपयोग करून हे जास्त छान साधता येते.

अर्थातच डेफ्थ ऑफ फिल्डचा उपयोग कसा करायचा ( पार्श्वभूमी ब्लर करायची की नाही हे ठरवणं) हे फोटोच्या गरजेनुसार ठरते.  तुम्हाला अर्जुनाा सारखा फक्त डोळाच टिपायचाय की संपूर्ण निसर्ग टिपायचाय यावर ते ठरेल.

Tuesday 13 March 2018

अँगल ऑफ द फोटो

फोटो कोणत्या अँगलने काढला आहे यावरही अनेकदा फोटोचे वेगळेपण ठरते.
अगदी समोरून फोटो काढला तर तो फ्लॅट/ टु डायमेन्शनल येण्याची भीती असते. त्या एेवजी थोडा अँगल बदलला तर तुमच्या फोटोला डेफ्थ येते, थ्री डायमेन्सनल इफेक्ट देताा येतो.

कधी अगदी लो लेव्हलला जाऊन फोटो काढले तर छान येतात. उदाहरणार्थ कमी उंचीच्या झाडांवरच्या  फुलांचेे फोटो, लहान मुलांचे फोटो.


कधी कधी आय लेव्हलवर काढलेले फोटो छान वाटतात. प्रामुख्याने प्राण्यांचे फोटो त्यांच्या आय लेव्हल ला जाऊन काढले तर छान दिसतात.
हा माझा एक फार आवडता फोटो:

तर कधी बर्ड व्हु अँगल वरून म्हणजेच खुप उंचावरून काढलेले फोटो छान दिसतात.

तर कधी खालून वर खुप उंचावरचे फोटो काढले तर छान दिसतात.


आपण कोणाचा फोटो काढतो आहोत यावर हा अँगल ठरवावा लागतो. कधी कधी आपले स्थानही ते ठरवते.