ब्लॉग फॉलो करा व नवीन लेख वा व्हिडिओची माहिती ई मेल वर मिळवा.

Monday 12 March 2018

वाईल्ड लाईफ फोटोग्राफी

जंगल अनुभवणं हा एक वेगळाच अनुभव! अगदी आवर्जुन एकदा तरी घ्यावाच असा. आणि एकदा तो अनुभव घेतला की जंगल आपल्याला पुन्हा पुन्हा आकर्षित करत रहातच :)
अन मग आपल्या हातातला कॅमेराही चटावतो  ;)
पण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी एक स्किलफुल जॉब आहे.
प्रथमत: वाईल्ड लाईफ अनुभवा. जंगल, तिथला अनुभव, प्राणी, त्यांचे जीवन, निसर्ग या सगळ्याला आधी अनुभवा. आपल्या डोळ्यांनी ते सगळं नीट बघा. प्राणी, त्यांचे जीवन, त्यांच्या प्रवृत्ती या माहिती करून घ्या. अन मगच कॅमेराकडे वळा. आधी अनुभव, मग त्यांचे चित्रिकरण! खरं तर हा नियम सगळ्याच फोटोग्राफीसाठी. पण वाईल्ड लाईफ साठी जास्त गरजेचा.
एकतर आपण जंगलात ज्या जिप्स/ वाहनांतून जातो ती खुप स्थिर नसतात. तसेच जंगलाचे रस्तेही फार गुलगुळीत नसतात. उंच सखल जंगल, जमिन, प्राण्यांचा माग काढताना वाहनांची होणारी पळापळ, ब्रेक्स, स्पिड अगदी गर्दीही, हे सगळं तुमचं फोटोग्राफी स्किल पाहणारं.
शिवाय जंगलातले प्राणी तुमच्यासाठी पोज देऊन कधीच उभे रहात नाहीत. उलट तुमची जरा चाहुल लागली की ते क्षणात नाहिसे होणारे.
जंगलातला उजेड हा एक असाच शत्रू. उन्हामधे सहसा प्राणी येतच नाहीत. शिवाय जंगलातील मोठ्या झाडांची सावली. त्यामुळे तुम्हाला हवा तसा उजेड फार क्वचित जंगलात मिळतो.  त्याचमुळे तुमच्याकडे थोडा चांगला कॅमेरा हवा, आय एस ओ, अपार्चर, शटर स्पिड या सगल्याची सवय हवी.
आणि सगळ्यात महत्वाचे, तुमचे नशीब हवे  ;) जंगलात प्राणी दिसणं, ते तुमच्या कॅमेराच्या रेंजमधे असणं, फोटो काढता येईल इतपत वाहन स्थिर असणं, नेमका क्षण तुम्हाला पकडता येणं, हे सगळं जमून यायचं तर नशीब दांडगंच हवं न  ;)
तर अशा रितीने तुम्ही सगळं पार पाडलत आणि फोटो काढलेत. तर ते काढताना काय काय केलं तर फोटो छान येतील याचा आता विचार करुत.
वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मधे सर्वात प्रथम लक्षात ठेवायचं ते म्हणजे भान! सजगता! कधी , कोणत्या क्षणी आपल्याला काय पहायला मिळेल याची काहीही खात्री नसते. एका क्षणी समोर काही नसतं अन दुसऱ्या क्षणी जंगलचा राजा जाळीतून तुमच्या समोर उभा रहातो, किंवा अचानक झाडाजवळ अस्वल आपल्या मागच्या पायावर उभं राहून, मी इथे आहे हे सांगतं, तर कधी अचानक समोरच्या झाडामागून एकादे हरिण पळत तुमच्या वाहना समोर येऊन कच्चकन थांबतं. हे क्षण टिपता आले पाहिजेत. आधी डोळ्यांनी, मग मनानी आणि शेवटी कॅमेराने.
लक्षात ठेवा तुमचे कान, डोळे, मन सगळं सजग असलं पाहिजे. शक्य झालं तर जंगलातले प्राण्यांचे कॉल्स ( ओरडून एकमेकांना सावध करणं) समजून घ्यायला शिका. जंगलाचा फिल समजून घ्या. जंगलातली हवा, आवाज, वास हेही आपल्याला सांगत असतात, दाखवत असतात. ते पहा, एेका.  आपले गाईड्स, वाहन चालक तिथले रहिवासी असतात, त्यांचा अनुभव मोठा असतो. त्यांचे एेका, विश्वास टाका त्यांच्यावर. आणि पेशन्स! पेशन्स ठेवा. शक्य आहे तासभर तुम्ही एका ठिकाणी थांबाल, काहीही हाती येणारही नाही. पण जंगल अनुभवा. आवाज, वास, वाहणारी हवा हे सगळं समजून घ्या. शक्य आहे एखादा अविस्मरणीय क्षण तुम्हाला मिळेलही!
तर फोटो काढताना जंगल, तिथला निसर्ग, झाडं, डोंगर, जमिन यांचाही विचार करा. जंगलातल्या प्राण्यांचे फोटो तर तुम्ही काढालच. ते काढताना सतत फक्त क्लोज अप नकोत. त्या प्राण्याची नैसर्गिक राहण्याची जागा, नॅचरल हॅबिटाट ही तुमच्यी फोटोतून दिसू द्यात.
शक्य झालं तर प्राण्याच्या आय लेव्हल वर जाऊन फोटो काढा. त्यासाठी झून लेन्सचा उपयोग करा. गाडीतून खाली उतरु नका. ते पूर्णपणे निषिद्ध आहे. नियम पाळा. जंगलाचा कायदा तोडू नका.
शक्यतो संपूर्ण प्राणी कॅमेरा फ्रेम मधे येईल असे पहा. अगदीच शक्य नसेल तर किमान त्याचे महत्वाचे फिचर्स येतील असे पहा.
प्राण्यांचे नाक, तोंड
सहसा पुढे असते. नाक, तोंड अन डोळे यात बऱ्यापैकी अंतर असते हे लक्षात ठेवा. फोकस करताना प्राण्याचे जनरल तोंड नाही तर डोळे हे फोकसिंगसाठी निवडा.
हरणांची शिंग, मोराचा पिसारा, अस्वलाची फर, वाघाचे मसल्स, ही वैशिष्ट्ये फोटोत पकडण्याची प्रयत्न करा.
धडाधड क्लिक करण्या एेवजी विचार करून, फ्रेम नीट ठरवून क्लिक करा.
आणि एखादा चकित करणारा अनुभव समोर असेल तर हे सगळे नियम बाजुला करूनही क्लिक करा .
शेवटी फोटोग्राफी कशासाठी? तर आपण अनुभवलेलं पुन्हा फोटोंतून अनुभवण्यासाठी. तेव्हा आधी अनुभवा. अन मग क्लिक करा :)

No comments:

Post a Comment

कमेंट खाली कृपया आपले नाव लिहा.
शक्य तर मला आपले फोटो पाठवा (इमेल/ व्हॉट्स अप ) तुमचे फोटो आणि त्यावरच्या माझ्या कमेंटस मी पोस्ट मध्ये अॅड करेन